Junnar सरपंचनामा न्यूज:नारायणगाव येथे कोरोना बाधित संशयित रुग्णाचे निधन ; मुंबईहून दोन दिवसांपूर्वी आला होता रुग्ण

Spread the love

सरपंचनामा न्यूज

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगावातील कोल्हेमळा येथील एका बिल्डिंगमध्ये एका संशयित कोरोना बाधित असलेल्या वृद्धाचे आज निधन झाले. या कोरोना बाधित संशयित वृद्धाचे स्वॅब पुणे येथील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील भटवाडी घाटकोपर येथून हा रुग्ण नारायणगाव येथे आल्याचे समजते. दरम्यान मयत वृद्धाच्या घरातील दोन व्यक्ती व त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींना लेण्याद्री येथील कोरोना विषाणू तपासणी केंद्रात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दरम्यान जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे आज सकाळी एक नवा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता त्यानंतर काही तासातच म्हणजे सायंकाळी सात वाजता आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे त्यामुळे तालुक्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या २१ एवढी झाली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेला डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झाला असून तालुक्यातील पूर्व भागातील औरंगपूर येथील एक जण २९ मे रोजी मृत्युमुखी पडला आहे.
जुन्नर तालुक्यामधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून सर्वत्र चिंता वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आणि विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज दि. ३० मे अखेर सायंकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या २१ एवढी झाली आहे. यामुळे सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर व गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी केले आहे.

जुन्नर तालुक्यातील गाव निहाय कोरोणा रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे

डिंगोरे – १ रुग्ण (बरा झाला आहे)
सावरगांव – ५
खिलारवाडी – १
मांजरवाडी -२
पारूडें – २
आंबेगव्हाण – २
धोलवड – ३
धालेवाडी तर्फे मिन्हेर – १
औंरगपूर – १ मृत्युमुखी
विठ्ठलवाडी वडज – १
शिरोली तर्फे आळे २

एकुण – २१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *