Khed सरपंचनामा न्युजः निधन वार्ताःजेष्ठ पत्रकार सुनील ओव्हाळ पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Spread the love

सरपंचनामा न्युज

शेलपिंपळगावःभोसे(ता.खेड) येथील पोलीस पाटील,जेष्ठ पत्रकार व प्रसिद्ध रंगकर्मी श्री सुनील मल्हारी ओव्हाळ पाटील(वय वर्ष ६०)
यांचे आज मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे ४:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी,दोन भाऊ,नातवंडे असा परिवार आहे. गावातील प्रत्येक सामाजिक कामात ते हिरीरीने सहभागी होत होते.लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरीब गरजू लोकांना खूप मदत केली.सर्वांना किराणा पोहचेल,कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून तळागाळातील वंचित घटकांपर्यंत जाऊन काम केले.त्यांच्या अकाली जाण्याने भोसे गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.दै.प्रभात सारख्या दैनिकाचे शेलपिंपळगाव प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली.पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयांना हात घालून न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडली.सुरुवातीच्या काळात ठोका पाचर नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी तालुक्यात खळबळ उडवून दिली होती.अभिनय,पटकथा व दिग्दर्शनाची आवड असल्यामुळे त्यांनी आझाद नाट्य कला मंचच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या नाटकांत अभिनयासह महत्वाची भूमिका पार पाडली.पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात बिजली कडाडली यासारख्या नाटकांत त्यांनी भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली.सदा हसत मुख,आणि मनाने तरुण असणाऱ्या सुनील ओव्हाळ पाटील यांचा सामाजिक कार्यातील सहभाग व उत्साह तरुणांना लाजवेल असा होता.त्यांच्या जाण्यामुळे खेड तालुक्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *