सरपंचनामा न्युज : आधी शेतकऱ्यांना पंगू करणारे कायदे रद्द करा – प्रा.डॉ. विकास सुकाळे

Spread the love

सरपंचनामा न्युज

आज शेती संबंधी मला असे वाटते की, खरे तर शेतकऱ्यांना कुठल्याही मदतीची गरज भासू नये, अतिवर्षण असेल किंवा अनावर्षण असेल शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपणास वैयक्तिक विमा काढता येतो, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही वैयक्तिक पिकांचा इन्शुरन्स काढता आला पाहिजे. यासाठी विमा कंपनी व शेतकरी दोघांनाही स्वातंत्र्य दिले पाहिजे. शेतकऱ्याला सरकारची बंधने नको आहेत .जर शेतकऱ्यावर सरकारचे नियंत्रण नसेल तर शेतकरी स्वावलंबी होऊन तो संकटाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतः उभा राहू शकेल. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते सर्वप्रथम दूर होणे आवश्यक आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा पारतंत्र्यात आहे. शेतकऱ्याला सरकारच्या मदतीवर अवलंबून राहण्याची गरज आहे. सरकारला सुद्धा असे वाटते की, शेतकरी हा आपल्यावर अवलंबून राहायला पाहिजे. आपण शेतकऱ्यासाठी फार काहीतरी करतो, शेतकऱ्याला मदत करतो अशी वारंवार भावना किंवा संदेश शेतकऱ्या पर्यंत पोहोचवण्यात सरकार मग्न असते. जेणेकरून निवडणुकीमध्ये या बाबीचा फायदा होईल.
आज विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यावर अतिवर्षणाचे जे संकट कोसळले आहे त्या संकटावर मात करण्यासाठी मात्र किमान आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. नांदेड भागांमध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे इकडे या भागात फारसे नुकसान झाले नाही. परंतु लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या भागातल्या जर आपण बातम्या पाहिल्या तर सोयाबीनच्या गंजी पावसात पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. हे पाहताना शेतकऱ्याच्या जीवाला काय वाटले असेल, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून आजच्या शेतकऱ्यांच्या पारतंत्र्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याला तात्काळ अंबुलन्स प्रमाणे मदतीची गरज आहे असे मला वाटते.

डॉ विकास सुकाळे, नांदेड
9423345145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *