Khed सरपंचनामा न्युज : मरणाने केली सुटका…पण स्मशानभूमीने छळले आहे ; वडगांव घेनंद स्मशानभूमी रस्ता व शेडची दुर्दशा ; गळक्या शेडमद्धे पत्रा लावून अंत्यसंस्कार करायची वेळ

Spread the love

सरपंचनामा न्युज | विवेक बच्चे

शेलपिंपळगाव : वडगांव घेनंद(ता.खेड) या गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची त्याचप्रमाणे स्मशानभूमीतील शेडची डागडुजी अभावी दुर्दशा झाली आहे.
नुकताच गावातील एका वृद्ध आजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जोराचा पाऊस सुरू झाला.आधीच थोडा थोडा पाऊस येत असल्याने शेडद्धेच अंत्यसंस्कारासाठी सरण रचले.पण हळू हळू पावसाचा जोर वाढला.नेमके सरणाच्या वरील भागातच शेडच्या कोपीचे पत्रे उडाल्याने अंत्यविधी सुरू असताना शेड जोरात गळू लागले. प्रसंगावधान राखून उपस्थित तरुणांनी सरण विझू न देता आसपास पडलेले पत्रे गोळा करून सरणाच्या बाजूने उभे केले व अंत्यसंस्कार पार पाडला.गावापासून स्मशान भूमी २ ते ३ किलोमीटर अंतरावर असल्याने व भरीस भर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षे दुरुस्ती न केल्याने दुर्दशा झाल्यामुळे अनवाणी पायांनी नातेवाईकांना खांद्यावर मयत आणणे जिकरीचे ठरत आहे.स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता व शेडची दुरावस्था पाहून मरणाने केली सुटका…पण स्मशानभूमीने छळले आहे असे म्हणायची वेळ मृत व्यक्तीच्या आत्म्यावर व नातेवाईकांवर आली असेच म्हणावे लागेल.
सामाजिक कार्यकर्ते सिताराम बवले,अक्षय बवले, भाऊसाहेब बवले, सुधिर बवले, नितीन बवले, खुशाल चौधरी, अजय बवले यांनी स्मशानभूमीचे शेड व रस्त्याच्या दुर्दशेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी जबाबदार कोण ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.या शेडसोबतच नदीपात्रात सिमेंटचे पक्के आर सी सी बांधकाम पण आहे.पण पावसाळ्यात पुराच्या धोक्यामुळे तिथे कोणी अंत्यसंस्कार करीत नाही.एरवी पण ते वापरात नाही,त्याच्या बाजूच्या कट्ट्यावरच अंत्यसंस्कार केले जातात.पावसाळ्याची गरज लक्षात घेऊन सध्या आहे तेच शेड तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी व पत्रा शेडच्या जागी कायमस्वरूपी आर सी सी बांधकाम असलेले शेड व लोकांना पावसाळ्यात बसता येईल असा मोठा मंडप उभारण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *