सरपंचनामा न्यूज:”ज्ञान ग्राम” उपक्रमासाठी गोखले अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाशी महाविद्यालयांचा सामंजस्य करार

Spread the love

सरपंचनामा न्यूज
(नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचा पथदर्शी प्रकल्प)

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाने पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील सहा महाविद्यालयाचे सामंजस्य करार संपन्न झाले.या निमित्ताने “नॉलेज कॉलेज व्हिलेज सहयोग योजना” व “ज्ञानग्राम”उपक्रमांचा पथदर्शी प्रकल्प कालच्या सामंजस्य करारातून व प्रकल्प नियोजन बैठकीतून पुणे जिल्ह्यातील सहा महाविद्यालयामार्फत सुरू झाला.
महाविद्यालयांनी निवडलेल्या गावामध्ये शाश्वत ग्राम विकासाचे सात महत्वाचे संशोधन प्रकल्प विद्यार्थी व प्राध्यापक यांचे सहयोगाने हाती घेण्यात येत आहेत.गोखले अर्थशास्त्र संस्थेचे डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड,आंबेगाव,जुन्नर व शिरूर तालुक्यातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय,एम. आय.टी. कॉलेज आळंदी, बी.डी.काळे कॉलेज घोडेगाव, ग्रामोन्नती मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव आणि पुण्याचे मॉडर्न कॉलेज गणेशखिंड ही महाविद्यालये या प्रकल्पात सहभागी झाली आहेत.
१)जैव विविधता (पर्यावरणीय शाश्वतता) २) जल संवर्धन जल सुरक्षा 3)गुणवत्तापूर्ण विकास शिक्षण ४)स्वास्थ्यपूर्ण आरोग्य ५)हरित ऊर्जा-(वेस्ट टू वेल्थ)
६)स्थानिक विकास प्रशासन सक्षमीकरण
७)शाश्वत शेती
महाविद्यालय परिसरातील या विषयाबाबत समस्या संशोधन व प्रशिक्षण आणि समस्या निराकरण उपाय शोधून महाविद्यालय, पंचायतराज प्रशासन आणि गोखले अर्थशास्त्र अभिमत विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने “ज्ञान ग्राम-शाश्वत ग्राम”या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी *उन्नत भारत अभियान* आणि *उन्नत महाराष्ट्र अभियान* या केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या शिक्षणाला ग्रामीण विकासाशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी व राज्याच्या विकासात उच्च शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणाऱ्या योजनांचा उपयोग करून घेण्यात होणार आहे असे
डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. कैलास बवले यांनी सांगितले.यशदा संस्थेच्या जलसाक्षरता केंद्राचे माजी संचालक डॉ.सुमंत पांडे यांनी शाश्वत ग्राम विकासासाठी शासन व प्रशासन सहयोग या विषयावर या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
——————————
विद्यार्थ्यांनी परिसरातील विकाससंबंधी छोट्या छोट्या प्रश्नावर अभ्यास व संशोधन करून अहवाल तयार करावेत,प्राध्यापकांनी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी.या सर्व अहवालाच्या एकत्रिकारणातून विद्यापीठ संशोधन प्रकल्प अहवाल तयार करेल व शासनास उपयुक्त धोरणं सुचवेल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अजित रानडे यांनी आश्वस्त केले.या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉईंट व आर्थिक लाभही मिळेल.
———————————–
सदर कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.कपिल जोध, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ.हेमांगी मोरे,प्रकल्पात सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक, प्रकल्पधिकारी, विविध विषयांचे प्राध्यापक उपस्थित होते.विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तसेच पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.पथदर्शी प्रकल्पाचे कृती नियोजनात विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षण,संशोधन,विज्ञान तंत्रज्ञान यांचा विविध विभागांच्या विस्तारसेवेच्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यार्थी यांचे सहयोगाने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने “ज्ञानग्राम”निर्मितीचा संकल्प करून समारंभाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!